धर्म अध्यात्म

वाळकी येथे जागृत देवस्थान माता इसाई देवी यात्रेला प्रारंभ; अखंड हरिनाम सप्ताह सुरु

हदगाव, गौतम हनवते | हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथील जागृत देवस्थान माता इसाई देवीच्या दहा दिवसांच्या यात्रेला 31 मार्चपासून प्रारंभ झाला असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहालाही उत्साहात सुरुवात झाली आहे.

माता इसाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशातून दरवर्षी हजारो भाविक येथे येत असतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती पुजारी विठ्ठल धर्माजी गायकवाड यांनी दिली.

यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या छबिन्याचा सोहळा 1 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मध्यरात्री पार पडणार आहे. या वेळी मंदिराला प्रदक्षिणा घालत “जय देवी”च्या जयघोषात हजारो भाविक सहभागी होतात.

माता इसाई देवीचे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून, मुख्य प्रवेशद्वारासमोर दीपमाळ आहे. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर दीपमाळीत तेल अर्पण करून श्रद्धा व्यक्त करतात. देवीची मूर्ती चुलीत असल्याची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा या मंदिराची ओळख आहे.

देवीच्या जन्माबाबतही स्थानिकांमध्ये आख्यायिका प्रचलित असून, पुजाऱ्यांच्या घरातील चुलीत बैलबंडार आढळून आल्याने देवी प्रकट झाल्याची कथा सांगितली जाते.

दरम्यान, यात्रेनिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!