नांदेड परिसरात गुटखा विरोधी मोहिमेला वेग; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड| नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


दि. 16 ते 31 मार्चदरम्यान पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे वडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने 30 मार्च रोजी उदगीर–अहमदपूर रोडवर संशयित बोलेरो वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये अवैध गुटखा साठा आढळून आला. या कारवाईत सुमारे 8 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई सुरू आहे. गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी यांसारख्या पदार्थांच्या साठवणूक, वाहतूक व विक्रीवर कडक निर्बंध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देण्यासाठी ‘खबऱ्या’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून 91 50 100 100 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असून दोषींना कठोर शिक्षा होणार आहे.




