क्राइम

वजीराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून १७ चोरीच्या दुचाकी जप्त

नांदेड | नांदेड शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत तब्बल १७ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण ₹३.९२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर कैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कशी उघडकीस आली चोरीची मालिका?
फिर्यादी मोहम्मद जुनेद कुरेशी (रा. देगलूर नाका, नांदेड) यांची मोटारसायकल १६ मार्च रोजी चिखलवाडी परिसरातून चोरीला गेल्याची तक्रार वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली.

हिंगोली गेट परिसरात दोन संशयित मुलं चोरीच्या मोटारसायकलसह थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

१७ दुचाकी चोरीचा पर्दाफाश
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर संबंधित बालकांनी शहरातील विविध ठिकाणांहून एकूण १७ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार विविध गुन्हे उघडकीस आले असून संबंधित वाहनं जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणी वजीराबाद व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या टोळीमागे आणखी कोणी आहे का, तसेच इतर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपास सुरू आहे. या धडक कारवाईमुळे नांदेड शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!