नांदेड जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी
विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
नांदेड | प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या ताज्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात 30 व 31 मार्च तसेच 1 व 3 एप्रिल 2026 या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांसह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


काय करावे?
वादळ व विजांचा अंदाज असल्यास बाहेर जाणे टाळा, सुरक्षित इमारत नसेल तर सखल जागेत बसून डोके गुडघ्यात घ्या, घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, विद्युत उपकरणे त्वरित बंद करा, लोखंडी वस्तू, विजेचे खांब व तारांपासून दूर राहा, पाण्यात असाल तर तात्काळ बाहेर पडा

काय करू नये?
विजा चमकत असताना लँडलाईन फोन वापरू नका, शॉवरखाली अंघोळ करू नका, पाण्याच्या नळांना किंवा पाइपलाइनला स्पर्श टाळा
तंबू, शेड किंवा उंच झाडाखाली उभे राहू नका
लोखंडी मनोऱ्याजवळ थांबू नका, घरात असताना खिडकी-दरवाजातून वीज पाहणे टाळा. नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

