एका दिवसात 500 विनातिकीट प्रवासी पकडले
नांदेड विभागात रेल्वेची धडक मोहीम, ₹3.42 लाखांची वसुली

नांदेड, अनिल मादसवार | प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने 26 मार्च 2026 रोजी व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवली. सकाळी 6 ते सायंकाळी 8 या कालावधीत झालेल्या या कारवाईत तब्बल 500 अनधिकृत प्रवासाची प्रकरणे उघडकीस आली असून एकूण ₹3,42,580 इतकी वसुली करण्यात आली.


या विशेष मोहिमेवर सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंह यांनी देखरेख ठेवली. 28 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी 25 गाड्यांमध्ये सखोल तपासणी केली.


तपासणीदरम्यान 449 विनातिकीट प्रवाशांकडून ₹2,14,410 भाडे आणि ₹1,15,190 दंड वसूल करण्यात आला. तसेच 15 अनियमित प्रवास प्रकरणांतून ₹3,730 भाडे व ₹3,750 दंड वसूल झाला. याशिवाय 36 अनबुक्ड सामान प्रकरणांतून ₹5,500 रक्कम वसूल करण्यात आली.


रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि सोबतचे सामान नियमांनुसार बुक करावे. विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे.




