नांदेड (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) जवानांनी आपल्या तत्परतेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा उत्कृष्ट नमुना सादर करत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रवाशांचा जीव व मालमत्ता वाचवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.


परभणी रेल्वे स्थानकावर ५ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेत, गाडी क्रमांक १२७८८ नागरसोल–नरसापूर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत असताना एक प्रवासी गाडीत चढताना अचानक घसरून प्लॅटफॉर्म आणि गाडीमधील धोकादायक फटीत अडकला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हेड कॉन्स्टेबल मोगरे पद्माकर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत त्या प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. सदर प्रवासी शेख मोहम्मद हे परभणी ते नांदेड प्रवास करत होते.


दरम्यान, ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत दुसऱ्या घटनेत सेलू रेल्वे स्थानकावर हरवलेली पर्स परत मिळवून देण्यात आली. पुणे येथील सौ. अविषा यांनी हडपसर एक्सप्रेसने प्रवास करताना आपली पर्स चुकून गाडीत विसरली होती. याबाबत हेल्पलाईन १३९ वर तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर हेड कॉन्स्टेबल शिवानंद मांते यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित डब्यातून पर्स शोधून काढली.

यानंतर प्रवाशाशी संपर्क साधून त्यांना RPF चौकी, सेलू येथे बोलावण्यात आले आणि पर्स सुरक्षितपणे परत करण्यात आली. या पर्समध्ये रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच बँकेची महत्त्वाची कागदपत्रे होती. या दोन्ही घटनांमधून RPF जवानांची सतर्कता, तत्परता आणि प्रवाशांप्रती असलेली जबाबदारीची जाणीव स्पष्टपणे दिसून येते. नांदेड रेल्वे विभागाने या कामगिरीचे कौतुक करत सुरक्षित आणि प्रवासी-अनुकूल सेवा देण्याच्या बांधिलकीची पुनरुच्चार केला आहे.





