राष्ट्रप्रेम घोषणांमध्ये नव्हे तर कृतीतून व्यक्त झाले पाहिजे – अनुजा डोईफोडे
नवज्योत फाउंडेशनच्या संस्कार शिबिरातून सामाजिक सद्भावना व राष्ट्रप्रेमाचा प्रभावी संदेश

नांदेड (गोविंद मुंडकर) “सामाजिक सद्भावना ही केवळ संकल्पना नसून ती आचरणातून दिसली पाहिजे; जागतिक घडामोडींची जाणीव ठेवून सजग नागरिक बनणे आवश्यक आहे; जाती-धर्माच्या भेदांपलीकडे मानवतेचा स्वीकार करणे हीच खरी प्रगती आहे; समाजसेवा हीच खरी राष्ट्रसेवा असून राष्ट्रप्रेम घोषणांमध्ये नव्हे तर कृतीतून व्यक्त झाले पाहिजे,” असे प्रतिपादन ‘मानसी’ महिला पुरवणीच्या संपादक अनुजा डोईफोडे यांनी नवज्योत फाउंडेशनच्या संस्कार शिबिरात केले.
संस्थापक नौनीहालसिंघ जागीरदार यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित जीवनाची दिशा देण्यात आली. आपल्या मार्गदर्शनात डोईफोडे यांनी इस्राईल-इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बदलत्या जागतिक परिस्थितीचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी व्यापक आणि सजग दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. स्थानिक पातळीवरील प्रश्नांबरोबरच जागतिक घडामोडींची जाणीव असणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक सद्भावना या संकल्पनेचे स्पष्टीकरण करताना त्यांनी परस्पर आदर, प्रेम, विश्वास आणि सहकार्य या मूल्यांवर समाजाची उभारणी होत असल्याचे सांगितले. शरीरातील एखाद्या अवयवाला वेदना झाल्यास संपूर्ण शरीर त्याची जाणीव ठेवते, त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखाशी आपले नाते जोडले गेले पाहिजे, असे प्रभावी उदाहरण त्यांनी दिले. ही भावना केवळ माणसांपुरती मर्यादित नसून सर्व सजीवांप्रती असावी, असेही त्यांनी नमूद केले.
इतिहासातील संतपरंपरेपासून ते आधुनिक समाज सेवकांपर्यंत सर्वांनीच मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला आहे, याची आठवण करून देत कवी दत्ता हलसगीकर यांच्या “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या ओळींचा उल्लेख करण्यात आला. जाती, धर्म, भाषा आणि लिंगभेद यांपलीकडे जाऊन समतेची भावना जोपासणे हीच खरी सामाजिक प्रगती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
समाजसेवेची प्रेरणा देताना बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाचा विशेष उल्लेख करण्यात आला. एका कुष्ठरोग्याच्या वेदनेतून उभे राहिलेले हे कार्य आज हजारो लोकांच्या जीवनात आशेचा किरण ठरले आहे. तसेच नांदेड येथील नेरली कुष्ठधाम पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्था आणि शेतकरी आत्महत्यांमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी कार्य करणाऱ्या देशमाने दांपत्याचे उदाहरण देत समाजातील वंचित घटकांसाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली.
राष्ट्रप्रेमाचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, केवळ घोषणांमध्ये किंवा प्रतीकांमध्ये मर्यादित न राहता ते कृतीतून, कर्तव्यभावनेतून आणि सकारात्मक दृष्टिकोनातून व्यक्त झाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद आणि गुरु गोविंदसिंघ, गुरुतेगबहादुर सिंघ यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना आदर्श घेण्याचे आवाहन केले. इस्राईलसारख्या देशाने संकटातही , देशप्रेम, संशोधन, शिस्त आणि आत्मनिर्भरतेच्या बळावर केलेली प्रगती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे, स्त्रियांप्रती आदराची भावना जोपासण्याचे, पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे तसेच घरापासून देशापर्यंत प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारीचा विस्तार करण्याचे आवाहन महत्व त्यांनी आपल्या भाषणात केले. “मंजिलें उन्हीं को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है, पंखों से काही होत नाही, हौसल्यांनीच उंच भरारी घेता येते,” या प्रेरणादायी संदेशाने आपल्या भाषणाचा समारोप केला.
