
लोहा| जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत असतानाही अफवांमुळे लोहा शहरात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंधनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
दुचाकी, चारचाकी, क्रेन, जेसीबी, हायवा आणि इतर वाहनांनी सकाळपासूनच पेट्रोलपंपांवर रांगा लावल्या होत्या. इंधन तुटवडा होईल या भीतीपोटी अनेकांनी “टँक फुल” करण्याकडे कल दर्शविला.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तरीही काही भागात भीतीचे वातावरण असल्याचे दिसून आले.
जानापुरीत गॅस सिलेंडरसाठी झुंबड
दरम्यान, तालुक्यातील जानापुरी येथे गॅस गोडाऊनसमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी उन्हातान्हात रांगा लावल्या.
प्रत्यक्षात गॅस पुरवठा सुरळीत सुरू असून, नोंदणी केल्यानंतर नियमानुसार सिलेंडर वितरण होत असल्याचे संबंधित एजन्सीकडून सांगण्यात आले. राजश्री मनोहर पाटील भोसीकर यांच्या एजन्सीद्वारे गॅस वितरण पूर्ववत सुरू आहे. व्यवस्थापक वैजनाथ भोसीकर ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असल्याची माहिती देण्यात आली.

अफवांवर विश्वास ठेवू नका – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. अफवांमुळे अनावश्यक गर्दी होत असून नागरिकांनी शांतता राखावी.
गॅस व इंधन तुटवडा नाही – तहसीलदार परळीकर
लोहा तालुक्यात गॅस आणि इंधनाचा पुरवठा नियमित सुरू आहे. गॅस सिलेंडर नोंदणीनुसार वेळेत मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोलपंप किंवा गॅस गोडाऊनवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले.



