हिमायतनगर तालुक्यातील सोनारीफाटा येथे उद्या नववी बौद्ध धम्म परिषद
नांदेड/हिमायतनगर| तालुक्यातील सोनारीफाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने रविवारी (दि. २९ मार्च) एकदिवसीय नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत धम्मदेसना, मान्यवरांचा गौरव, व्याख्याने तसेच ख्यातनाम शाहिरांच्या समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचा बहारदार मेळा रंगणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिषदेची सुरुवात सकाळी पंचशील ध्वजारोहणाने होणार असून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर पुज्यनिय भन्ते पय्यारत्न थेरो यांची धम्मदेसना होणार आहे. दुपारी प्रा. डॉ. जे. टी. जाधव व प्रा. डॉ. विजय गोणारकर यांची विचारप्रवर्तक व्याख्याने होणार आहेत.
दुपारी २ वाजल्यापासून बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून भिमशाहीर माधव वाढवे, विकासराजा गायकवाड, बापूराव जमधाडे, शंकर गायकवाड, नरेंद्र दोराटे, राजेश भारती, अशोक चौरे आदी कलाकार सहभाग घेणार आहेत. सायंकाळी ५ वाजता विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यानंतर रात्री सुप्रसिद्ध गायिका स्वरादिदी तामगाडगे (नागपूर), सपनाताई खरात (बुलढाणा), धम्मानंद शिरसाठ (वाशीम) व कवी-गायक रवीराज भद्रे यांच्या शाहिरी कार्यक्रमातून समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे. या परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते होणार असून पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर भूषवणार आहेत.
यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार भिमराव केराम, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी जाहीर
या परिषदेत सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२५-२६” प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये कमलबाई तलवारे, किरण अंबेकर, भारत खेलबाडे, एस. के. शिंदे, प्रा. डॉ. अनिल काळबांडे, पोलीस निरीक्षक अमोल भगत, मंगेश पाटील, पि. एम. जाधव, प्राचार्य डि. डि. घोडके, अशोक पवार, एस. एम. हिरप, नारायण काळे, गझलकार मधु बावलकर, एम. सायलू म्हैसेकर, आनंद वाढे, शाहीर दिलीप कोसले, गणेश कोकुलवार, प्रभू सावंत, बापूराव जमधाडे, संध्याताई रणवीर आदींचा समावेश आहे.
आवाहन आयोजकांचे
या परिषदेच्या यशस्वीतेसाठी संयोजक त्रिरत्नकुमार भवरे, स्वागताध्यक्ष तथा हिमायतनगरचे नगराध्यक्ष शेख रफिख, प्रा. मोहन मोरे यांच्यासह संपूर्ण संयोजन समितीने जोरदार तयारी केली आहे. समाजप्रबोधन आणि बौद्ध धम्माचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.