हरवलेलं सोनं परत; प्रामाणिकपणाने जिंकली मने
हिमायतनगरात तरुणांचा आदर्श; शेतकऱ्याची मौल्यवान अंगठी सुरक्षित परत
हिमायतनगर, अनिल मादसवार| आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण हिमायतनगर येथे पाहायला मिळाले. बोऱगडी येथील शेतकरी प्रभू शेणेवाड यांची हरवलेली सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे परत देत काही तरुणांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शेतकरी प्रभू शेणेवाड यांनी हिमायतनगर येथील प्रतिष्ठित व्यापारी संदीप पळशीकर यांच्या अभिषेक ट्रेडिंग कंपनी येथे कापूस विक्रीसाठी नेला होता. त्या गडबडीत त्यांची 1 तोळा वजनाची सोन्याची अंगठी हरवली. बराच शोध घेतल्यानंतरही अंगठी सापडत नसल्याने त्यांनी ती हरवली असे गृहित धरले होते.


दरम्यान, हिमायतनगर येथे वाहन भरताना रमेश बनसोडे यांच्यासोबत काम करणाऱ्या फकीरा सोळंके यांना ती अंगठी सापडली. कोणत्याही मोहाला बळी न पडता त्यांनी तत्काळ प्रामाणिकपणा दाखवत संबंधित शेतकऱ्याचा शोध घेत अंगठी परत केली.


आपली हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने शेतकरी शेणेवाड यांनी आनंद व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले. या घटनेमुळे हिमायतनगर शहर परिसरात माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा संदेश पोहोचला आहे.

आजच्या काळातही अशा प्रामाणिक व्यक्तींमुळे समाजातील विश्वास आणि सद्भावना टिकून असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. अशी माहिती प्रभू कल्याणकर यांनी ALMNetwork शी बोलतांना दिली.



