हदगाव | हदगाव येथील आर्य वैश्य समाजाने मंगल कार्यालय उभारण्यासाठी केलेली निधी उभारणी ही इतर समाजांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंद बिडवई यांनी केले. ते हदगाव येथे आयोजित आर्य वैश्य मंगल कार्यालय भूमिपूजन, देणगीदारांचा सहपरिवार सत्कार व महासभेच्या पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, नांदेड जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आणि मंगल कार्यालयाचे भूमिपूजन मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात बोलताना गोविंद बिडवई यांनी सांगितले की, छोट्याशा गावात सुमारे ९० कुटुंबे असतानाही तब्बल ८० घरांनी स्वखर्चाने देणगी देत मंगल कार्यालय उभारण्याचा घेतलेला संकल्प हा समाजाच्या एकजुटीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. “आपणच आपल्या समाजासाठी उभे राहून विकास साधण्याची ही प्रेरणादायी कृती आहे,” असे त्यांनी नमूद केले.


प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ मामडे यांनीही समाजाच्या या उपक्रमाचे कौतुक करत, “हदगावकरांच्या भावनांचा आदर राखून या मंगल कार्यालयासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही आणि लवकरच हे बांधकाम पूर्णत्वास जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविकात जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रभाकर पत्तेवार यांनी समाजाने अनेक वर्षांपासून पाहिलेले मंगल कार्यालयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचे सांगितले. तर संघटक डॉ. संजय पलीकोंडावर यांनी सर्वांच्या सहकार्याने हे काम निश्चित पूर्णत्वास नेण्याचा निर्धार व्यक्त केला.


या कार्यक्रमाला विविध मान्यवर, समाजबांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम वट्टमवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिरीष मनाठकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वासवी क्लब, आर्य वैश्य समाज व महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“मागील अनेक वर्षांपासून पाहिलेले मंगल कार्यालयाचे स्वप्न वासवी मातेच्या कृपेने व सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होत आहे.”— श्रीनिवास दमकोंडवार, अध्यक्ष, आर्य वैश्य समाज



