नांदेड (प्रतिनिधी) शहरात घडलेल्या सोनू कल्याणकर यांच्या निर्घृण हत्येनंतर संतापाची लाट उसळली असून सामाजिक माध्यमांवर श्रद्धांजलीसोबतच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.


श्रीनगर परिसरात पहाटे झालेल्या या हल्ल्यात सोनू कल्याणकर यांचा मृत्यू झाल्यानंतर विविध समाज घटकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः लिंगायत समाजाकडून मोठ्या प्रमाणात भावनिक श्रद्धांजली पोस्ट शेअर केल्या जात असून “ही केवळ श्रद्धांजली नसून न्यायासाठीचा आवाज आहे” असा संदेश दिला जात आहे.



व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेविरोधात एकजूट दाखवण्यासाठी नागरिकांना पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सोनू कल्याणकर हे शिवा नरंगले यांचे भाचे असल्याने या प्रकरणाला सामाजिक व राजकीय स्तरावरही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या घटनेमुळे नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून पोलिसांनी तत्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी होत आहे.





