नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


आज सकाळी ९ वाजता महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, तालुका समन्वयक व समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जयंतीनिमित्त उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना शुभेच्छा देताना मान्यवरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाजसुधारणेतील कार्याचा आढावा घेत प्रेरणादायी विचार मांडले. यानंतर समाज कल्याण कार्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भिमराव हाटकर, राज गोडबोले, संभाजी कांबळे व गजानन नरवाडे उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मुख्य वक्ते डॉ. भिमराव हाटकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान सामूहिक संविधान वाचनही करण्यात आले.





