Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
HomeUncategorizedसामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे. महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.

मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार

महात्मा फुले यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे “मानव हा सर्वात मोठा धर्म आहे” ही भूमिका. त्यांनी धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. त्यांच्या लेखनात आणि कृतीतून सतत दिसून येते की, समाजातील अन्याय आणि विषमता दूर केल्याशिवाय खरी प्रगती होऊ शकत नाही. त्यांनी मांडलेली समतेची संकल्पना ही केवळ तात्त्विक नव्हती, तर ती प्रत्यक्ष कृतीतून साकारलेली होती.

शिक्षणाची ज्योत : अज्ञानातून मुक्तीचा मार्ग

महात्मा फुले यांनी घेतलेला सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे शिक्षणाचा प्रसार. त्यांनी प्रथम स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि त्यानंतर १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनीही समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःला शिक्षणासाठी वाहून घेतले. शेण गोट्याचा मार सहन करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. जोतीबा आणि सावित्री या दांपत्याच्या त्या काळातील सामाजिक बंडामुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली.त्या काळात स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही त्यांनी मागे हटणे स्वीकारले नाही. शिक्षण हेच शोषणाविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ही त्यांची धारणा होती. या कार्यातून त्यांनी समाजातील अज्ञानाची बेडी तोडण्याचा प्रयत्न केला.अविद्या हेच शोषणाचे मुख्य कारण आहे हे सांगताना त्यांनी समाजाला याबाबतचा कठोर संदेश दिला…

विद्येविना मती गेली…मतीविना नीती गेली…नितीविना गती गेली…..गती विना वित्त गेले…. वित्तविना शूद्र खचले….इतके अनर्थ एका अविद्येने केले…

अन्यायाविरुद्ध बंड – त्या काळातील समाज रुढी-परंपरांच्या कठोर बंधनात अडकलेला होता. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रीदास्य आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रथांनी समाजाला जखडून ठेवले होते. महात्मा फुले यांनी या सर्व प्रथांविरुद्ध उघडपणे आवाज उठवला. त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थळे उभारली, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या कृतीतून समाजातील महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळाली.

सत्यशोधकांचा मार्ग : समतेची संघटित चळवळ

सन १८७३ मध्ये त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद,अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध संघटित लढा उभारला. सत्यशोधक समाजाने समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. ज्यामध्ये सत्य, समता आणि बंधुता यांना केंद्रस्थानी ठेवले आहे.सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी एक समांतर विज्ञानवादी भूमिका समाजापुढे मांडली.तत्कालीन ब्राह्मण्यवादाला झुगारून नव्या चालीरीती समाजाला दिल्या.

शेतकऱ्यांचा आवाज : अन्यायाविरुद्धचा प्रहार

महात्मा फुले यांनी केवळ सामाजिकच नव्हे, तर आर्थिक विषमतेवरही भाष्य केले.त्यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड” या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाचे अत्यंत वास्तव चित्रण केले आहे. महसूल व्यवस्थेतील अन्याय, सावकारशाहीचे शोषण आणि प्रशासनातील दुर्लक्ष यावर त्यांनी कठोर टीका केली. शेतकरी हा समाजाचा कणा असूनही त्याचे जीवन दारिद्रयात का अडकले आहे, हा प्रश्न त्यांनी समाजासमोर उभा केला.

विचारांची शस्त्रे : लेखनातून घडवलेले परिवर्तन

महात्मा फुले हे केवळ कृतीशील समाजसुधारक नव्हते, तर प्रभावी लेखकही होते. “गुलामगिरी” या ग्रंथातून त्यांनी जातीव्यवस्थेवर प्रखर प्रहार केला, तर “सार्वजनिक सत्यधर्म” मधून मानवतावादी धर्माची संकल्पना मांडली. त्यांच्या लेखनातून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य झाले. यातून त्यांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट होते.याशिवाय त्यांनी गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड,ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न,सार्वजनिक सत्य धर्म,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा लिहून शिवरायांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख करून दिली.रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीची स्वच्छता केली.शिवाजी महाराजांच्या स्मृती पुनरुज्जीवनाच्या प्रारंभीच्या प्रयत्नांपैकी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व त्यांना मानले जाते.

सार्वजनिक जीवनातील योगदान

महात्मा फुले यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेच्या कार्यातून त्यांनी नागरी प्रश्नांवर काम केले. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांनी ब्रिटिश प्रशासनाशी संवाद साधून सामाजिक प्रश्न मांडले आणि वंचित घटकांसाठी न्यायाची मागणी केली. शासन कोणतेही असो, ते न्याय्य आणि लोकहितकारी असले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती.हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी निवेदन सादर केले.सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला.

सामाजिक सुधारणा स्वीकारल्या – इंग्रजांच्या काही सामाजिक सुधारणांना स्वीकारताना त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक नीतीवर सडकून टीका केली. एवढेच काय इंग्रजांना समजेल अशा भाषेत त्यांनी त्याची उत्तरे दिली. कोणताही पहिला प्रयोग स्वतःच्या घरी, स्वतःच्या कुटुंबावर करून ‘बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पाऊले’, असा आदर्श त्यांनी समाजामध्ये निर्माण केला आहे.

स्वतःच्या पत्नीला शिकवले. स्वतःची विहिर मागास वर्गीयांसाठी खुली केली. ब्राह्मण्यवादाचा आयुष्यभर विरोध करुनही त्यांनी  एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला.त्या मुलाचे आंतरजातीय लग्न लावून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. महात्मा जोतीबा फुले यांनी घेतलेले निर्णय अशा प्रकारे कायम प्रेरणादायी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह करणारे पहिले पालक ठरले आहेत. काळाची पावले ओळखून नवनव्या प्रयोगाद्वारे सामाजिक सुधारणा करण्यात भारतातल्या सर्व सामाजिक सुधारणा करणाऱ्या थोर पुरुषांमध्ये त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले वेगळे ठरले आहेत.

यशस्वी व्यावसायिक – सामाजिक कार्य, संघटना सुरु ठेवण्यासाठी आर्थिक स्त्रोत मजबूत असणे आवश्यक असते. त्यासाठी अंगी व्यावसायिक कसब बाळगणे खूप गरजेचे असते. संघटना, चळवळी, सुधारणांचा डोलारा चालविण्यासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी आदर्श पद्धतीने व्यवसाय करुन स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सोदाहरणासह मांडून ठेवले. त्यांनी कंत्राटदार म्हणून अतिशय उत्तमपणे काम केले. आजही त्यांच्या सहभागात तयार झालेल्या वास्तू प्रेरक आहेत. पूल, धरणे, कालवे या बांधकामात कंत्राटदार म्हणून त्यांनी काम केले.

आजच्या काळातील विचारांची प्रासंगिकता

महात्मा फुले यांच्या कार्याला दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही तितकीच आहे. शिक्षणातील विषमता, सामाजिक भेदभाव आणि स्त्रीसमानतेचे प्रश्न अद्यापही पूर्णतः संपलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार आणि आचरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास केल्यास समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेली दृष्टी मिळते.

ज्योतिराव परिवर्तनाची अखंड प्रेरणा

महात्मा ज्योतिराव फुले हे एक व्यक्तिमत्त्व नसून एक चळवळ, एक विचारधारा आणि एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या कार्यातून राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरणा घेतली.त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्राला फुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख प्राप्त झाली आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे केवळ आदर व्यक्त करणे नव्हे, तर त्या मूल्यांना आपल्या जीवनात रुजवण्याचा संकल्प करणे होय.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात विशेष समिती स्थापन केली असून वर्षभर महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याला साजेशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे.

लेखक…प्रवीण टाके, उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर..9702858777

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!