नांदेड| ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांना मानवंदना देणारा ‘सावळ्या विठ्ठला’ हा सांगीतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे.


दशरथ पुजारी यांनी मराठी भावसंगीत व भक्तिसंगीताला नवे आयाम दिले. “केशवा माधवा”, “देव माझा विठू सावळा”, “या लाडक्या मुलांनो”, “झिमझिम झरती श्रावण धारा” यांसारखी त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या संगीतातून वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ झाला असून भावसंगीताला त्यांनी उंचीवर नेले आहे.


या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती आनंदीविकास यांची असून गायक कलाकार म्हणून सागर जाधव, शेफाली कुलकर्णी आणि वर्षा जोशी सहभागी होणार आहेत. तसेच वादक कलाकारांमध्ये विकास देशमुख, विवेक कयाळ, विश्वेश्वर कोलंबीकर, पंकज शिरभाते, भगवानराव देशमुख, श्रीनिवास लंकावाड, शेख नईम व शेख इस्माईल यांचा सहभाग राहणार आहे. संवादक म्हणून पद्माकर कुलकर्णी उपस्थित राहतील.

हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार तसेच विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. नांदेड व परिसरातील नागरिक, विद्यार्थी तसेच संगीत व साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





