“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा राज्यव्यापी शुभारंभ

मुंबई| जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ग्रामीण महाराष्ट्राचा आरोग्यदायी चेहरा घडविण्यासाठी राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

अभियानाविषयी सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. यावेळी अभियानाची माहिती देणाऱ्या व्हिडिओ व पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या अभियानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे. स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी संबंधित आजारांनाही विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव” म्हणून गौरविण्यात येणार असून, यासाठी ६५.२५ कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे अभियान केवळ शासकीय योजना नसून एक व्यापक लोकचळवळ ठरणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांच्या सक्रिय सहभागातून निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज घडविण्याचा मार्ग या उपक्रमामुळे खुला होईल, असा विश्वास प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top