बिलोली (प्रतिनिधी) कै.व्यंकटेश कुंचनवार यांच्या स्मरणार्थ आणि बिलोली शहर विकास कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने बिलोली शहरात जुन्या बसस्थानक परिसरात शुक्रवारी पाणपोईचे यंदाही मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गत 35 वर्षापासून ही पाणपोईची परंपरा जोपासली गेली आहे.


शहर विकासाचा ध्यास घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून बिलोली शहर विकास कृती समिती काम करते. त्याच अनुषंगाने कै. व्यंकटेश कुंचनवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी पाणपोईचे स्टॉल लावून तहानलेल्यांची तृष्णा भागविली जाते. या सामाजिक कार्यास 35 वर्षाचा इतिहास आहे. हीच परंपरा यंदाही उष्णतेची तीव्रता पाहून आणि या मार्गावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना पिण्यास पाणी मिळावे या हेतूने कायम राखण्यात आली. बिलोली शहर विकास कृती समितीतर्फे शुक्रवारी जुना बस स्थानक परिसरात पाणपोईचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी शहर विकास कृती समितीचे अध्यक्ष गोविंद मुंडकर कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुभाष पवार, सचिव तथा माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक यशवंत गादगे, नगरसेविका मैमुना बेगम अमजद खान, माधवराव जाधव, श्रीमती मीरा संगनोर, रायकंठवार, अभिजीत तुडमे, माजी नगरसेवक अमजद चाऊस, सय्यद रियाज, आदी उपस्थित होते. दरम्यान कुंचनवार कुटुंबीय व शहर विकास कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाची माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे यांनी प्रशंसा केली.





