लोहा| लोहा शहराजवळील पिंपळगाव ढगे व धानोरा (शे) या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याचा तब्बल २० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व त्यांच्या पथकाच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न केवळ दोन दिवसांत मार्गी लागला.


पिंपळगाव ढगे येथे भीम जयंती मिरवणुकीवरून पूर्वी वाद निर्माण झाला होता. याबाबत काही दिवसांपूर्वी शिष्टमंडळाने तहसीलदार विठ्ठल परळीकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप व पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी दोन्ही गावांतील ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले.


गावात आयोजित बैठकीत दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी जुन्या वादांना बाजूला ठेवत शांततेच्या वातावरणात चर्चा केली. यामध्ये मिरवणुकीचा मार्ग निश्चित करण्यात आला असून सर्वानुमते भीम जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेत डीएसबीचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सदाशिव जामकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. गावातील पूर्वीच्या परिस्थितीची माहिती असल्याने त्यांनी प्रशासनाला योग्य मार्गदर्शन केले.

दरम्यान, धानोरा शेलगाव येथेही मिरवणुकीसंदर्भात नवीन परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत दोन्ही समाजातील बांधवांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा मार्ग निश्चित करून परवानगीस सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या बैठकीस डीवायएसपी डॉ. अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, सहायक पीएसआय सदाशिव जामकर यांच्यासह सरपंच, नगरसेवक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

तसेच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही पुढाकार घेत प्रशासनाशी संपर्क साधून बैठक घेण्यास सुचविले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही गावांमध्ये मिरवणुकीस परवानगी देण्यात येणार असून, २० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.




