नांदेड | नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी धडक कारवाई करत विविध ठिकाणी ‘मास रेड’ राबवली. या कारवाईत अवैध दारू, हातभट्टी, जुगार आणि गुटखा व्यवसायावर कारवाई करत 2 लाख 32 हजार 662 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 11 एप्रिल रोजी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी-अंमलदार सहभागी झाले होते.



60 गुन्हे दाखल, 65 आरोपींवर कारवाई
मास रेड दरम्यान विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 60 गुन्हे दाखल करण्यात आले असून 65 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलीस प्रशासनाने संकेत दिले असून, जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे.






