गंगाई सेवाभावी संस्थेला राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान

मुंबई/नांदेड/नायगांव/हिमायतनगर| समाजातील व्यसनमुक्तीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हिमायतनगर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा गौरव २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.


या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, विधानसभा अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, प्रधान सचिव डॉ. सिद्धोधन कांबळे तसेच समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार सचिव प्रा. गोपाळराव विठ्ठलराव हरडपकर व सौ. अश्विनी गोपाळराव हरडपकर यांनी स्वीकारला.


गेल्या दहा वर्षांपासून हि संस्था व्यसनमुक्ती अभियान, जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन शिबिरे तसेच शाळा-विद्यार्थ्यांमध्ये समुपदेशनाचे उपक्रम नांदेड जिल्ह्यातील नायगाव परिसरात राबवत आहे. समाजात व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी केलेल्या या कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान संस्थेला प्रदान करण्यात आला आहे.


हा पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव संभाजी हरडपकर, उपाध्यक्ष संतोष हरडपकर, सहसचिव रामराव शिंदे, कोषाध्यक्ष संजय शिंदे तसेच सर्व सदस्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. या यशामुळे हिमायतनगर तालुक्याच्या सामाजिक कार्याला नवी ओळख मिळाली असून, संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




