नांदेड| नांदेड जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या नंदगिरी किल्ला च्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना अंदाज समितीचे सदस्य तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी झालेल्या समिती बैठकीत केली.


नंदगिरी किल्ला हा नांदेड जिल्ह्याचा प्राचीन ठेवा असून काही वर्षांपूर्वी तो नामशेष होण्याच्या मार्गावर होता. मात्र अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी गडप्रेमींना एकत्र करून ‘किल्लेदारांची फौज’ उभी केली. गेल्या तीन वर्षांपासून दर रविवारी मोहिमा राबवत किल्ल्याचे संवर्धन करण्यात आले आणि शासनाचे लक्ष या ठिकाणी वेधले गेले.


किल्ल्याच्या विकासासाठी शासनाकडून सुमारे 6 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. अलीकडेच नंदगिरी किल्ल्यावर शिवकालीन सुवर्ण होन, प्राचीन नाणी, शस्त्रास्त्रे व आयुधे यांचे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला नांदेडसह परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अंदाज समितीच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान व्यस्त वेळापत्रक असूनही सदाभाऊ खोत यांनी नंदगिरी किल्ल्याला भेट देत गोदावरी नदीकाठावरील संपूर्ण परिसराची पाहणी केली व किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला. यावेळी त्यांनी किल्लेदारांच्या कार्याचे कौतुकही केले.


नांदेडचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने किल्ल्याचा विकास करण्यासाठी डिपीडीसीमधून अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी बैठकीत केली. या भेटीवेळी मनपाचे अधिकारी तसेच नंदगिरी किल्ला संवर्धन संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.




