नांदेड| जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तीकरण असोसिएशन (नोंदणी प्रक्रिया सुरू), दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र, तसेच बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीसह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.


संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


संजय गांधी निराधार योजनेतील थकीत मानधन तात्काळ जमा करावे, आमदार व खासदार निधीतून दिव्यांगांसाठी राखीव निधी खर्च करावा, DPDC अंतर्गत १% निधीचा वापर करावा, जिल्हाधिकारी बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करावी, दिव्यांग सक्षमीकरण विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीची चौकशी करावी, वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, तुकाराम मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करावी अश्या प्रमुख मागण्या करणार आहेत.

संघटनेने यापूर्वी २ एप्रिल रोजी मुंबईतील मंत्रालयात आंदोलन करून मुख्यमंत्री सचिवालयाला निवेदन दिले होते, तर ४ एप्रिल रोजी स्मरणपत्रही पाठविण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनादरम्यान दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झालेली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.

आंदोलनाचा इशारा
८ एप्रिल २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास ९ एप्रिलपासून मुंबईतील मंत्रालयासमोर आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा वापर झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासन व प्रशासनावरच राहील, असे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.




