केज/माहूर| केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ हा अपघात घडला.


प्राथमिक माहितीनुसार, स्वतःच्या कारने प्रवास करत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. राकेश गिड्डे हे कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने महसूल प्रशासनासह केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

विशेष म्हणजे, २०२१ मध्ये त्यांनी माहूर येथे तहसीलदार तसेच नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांनी नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. या दुर्दैवी घटनेमुळे माहूर शहरातही तीव्र हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.





