नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार | संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या आदिवासी समाजाच्या जीवनात वनउपजांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्या दैनंदिन जगण्याला चव देण्याबरोबरच आर्थिक आधार देणाऱ्या या वनसंपदेमध्ये ‘चारोळी’ या फळाचे विशेष स्थान आहे. मात्र सध्या हीच चारोळी दुर्मिळ होत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात आढळणाऱ्या चारोळीला ग्रामीण भागात ‘जंगलाची काळी मैना’ असे संबोधले जाते. पूर्वी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे हे फळ आता हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर शहरातील नागरिकांना चारोळी पाहायलाही मिळणे कठीण झाले आहे.


यामागे मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड, जंगलांचा घटता विस्तार आणि पर्यावरणातील बदल ही प्रमुख कारणे असल्याचे जाणकार सांगतात. जंगलांची होणारी सततची हानी ही केवळ जैवविविधतेसाठीच नव्हे, तर आदिवासींच्या पारंपरिक उपजीविकेसाठीही घातक ठरत आहे.


चारोळीसारख्या वनउपजांमुळे आदिवासी कुटुंबांना उन्हाळ्यात रोजगार व उत्पन्नाचा स्रोत मिळत असे. मात्र ही नैसर्गिक संपत्तीच कमी होत असल्याने त्यांच्या आर्थिक घडीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.


पर्यावरण संवर्धन आणि जंगलांचे संरक्षण यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आता अधिक तीव्र झाली आहे. अन्यथा भविष्यात चारोळी केवळ आठवणीतच उरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.




