धर्म अध्यात्म

खडकी बा. येथील जागृत रोकडोबा मारोती मंदिर, परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा संगम

आमली बारशीच्या दिवशी भगवा ध्वज फडकवून व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण

हिमायतनगर (अनिल मादसवार ) तालुक्यातील मौजे खडकी (बा.) येथील जागृत देवस्थान रोकडोबा मारोती मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. बाल अवतारातील दक्षिणमुखी हनुमानाची ही मूर्ती पुरातन काळापासून येथे विराजमान असून, तिच्याशी निगडित एक विशेष आख्यायिका स्थानिकांमध्ये प्रचलित आहे.

माहितीनुसार, ही मूर्ती बैलगाडीतून सिरंजणी येथे नेण्यात येत असताना खडकी येथे मुक्कामासाठी थांबलेला ताफा दुसऱ्या दिवशी पुढे निघाला, मात्र मूर्ती असलेली बैलगाडी हललीच नाही. यानंतर खडकी व सिरंजणी गावातील नागरिकांनी ही दैवी इच्छा मानून येथेच मूर्तीची स्थापना केली. त्या दिवसापासून या मंदिराला “रोकडोबा मारोती” म्हणून ओळख मिळाली.

दरवर्षी आमली बारशीच्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. भगवा ध्वज फडकवून व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून भक्तिभावाने पूजा केली जाते. गुढीपाडव्यापासून आमली बारशीपर्यंत शिवपुराण कथा व प्रवचनाचे आयोजन केले जाते. उत्सवाच्या सांगतेला भव्य महाप्रसाद व ‘चूल बंद’ कार्यक्रम पार पडतो.

oplus_32

विशेष म्हणजे बारशीच्या दिवशी मानकरी अशोक तालेवार यांच्या हस्ते मंदिराचा कळस स्वच्छ करून पुन्हा चढवण्याची परंपरा आजही जपली जाते, अशी माहिती ज्ञानेश्वर राहुलवाड यांनी दिली.

oplus_32

शेतकरी वर्गासाठीही हे मंदिर श्रद्धेचे केंद्र आहे. खरीप व रब्बी हंगाम चांगला उत्पन्न देणारा व्हावा, यासाठी गावातील शेतकरी सकाळी मूर्तीला पाणी अर्पण करून रोकडोबा मारोतीचे दर्शन घेतात. मंदिर परिसरात दीपमाळ, गणपती, दत्तात्रेय, मारोती, मार्कंडेय, नंदी महादेव अशा विविध देवतांच्या मूर्ती आहेत.

दर शनिवारी येथे मोठी गर्दी होत असून महारती केली जाते. तसेच श्रावण महिन्यात सप्ताहाचे आयोजन केले जाते. दरम्यान, मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, तसेच या पुरातन वास्तूचे जतन करावे, अशी मागणी भाविक व ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!