नांदेड/बिलोली| कुंडलवाडी (जि. नांदेड) येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत कुंडलवाडी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत प्रतिबंधित धारदार तलवारीसह एका युवकाला जेरबंद केले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी महालक्ष्मी मंदिर परिसरात एक संशयित इसम धारदार शस्त्रासह फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.


पंचांच्या उपस्थितीत संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 31 इंच लांबीची लोखंडी तलवार, तिची म्यान आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या तलवारीची किंमत सुमारे 6 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

अटक करण्यात आलेला आरोपी हर्ष उर्फ हर्षसिंग हाणमंत इंगळे (वय 19, रा. इंदिरानगर, तरोडा बुद्रुक, नांदेड) हा असून, तो विनापरवाना प्रतिबंधित शस्त्र बाळगून संशयित हालचाली करत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, या धाडसी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.




