नांदेड| स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी व्यक्त केलेली नांदेड भेटीची इच्छा त्यांच्या निधनामुळे अपूर्णच राहिली. त्यांच्या या अपूर्ण इच्छेची हळहळ व्यक्त करत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.


आशाताईंनी “मला नांदेडला यायचं आहे, सचखंड गुरुद्वारा (Sachkhand Gurudwara) येथे दर्शन घ्यायचे आहे. आपण लवकरच कार्यक्रम ठरवूया,” असा शब्द दिला होता. मात्र नियतीला हे मान्य नसल्याने त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली, असे चव्हाण यांनी भावुक शब्दांत सांगितले.


सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी आशाताईंशी असलेल्या स्नेहबंधांचा विशेष उल्लेख केला. ९०च्या दशकात आशाताई नांदेडला आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा सचखंड गुरुद्वारात दर्शनासाठी येण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, असे त्यांनी नमूद केले.

कोरोना काळानंतर प्रसाद महाडकर यांच्या माध्यमातून आशाताईंशी दूरध्वनीवर संवाद साधला गेला. त्यावेळी त्यांनी नांदेड भेटीची इच्छा व्यक्त केली होती. चव्हाण यांनी त्यांना निमंत्रणही दिले होते, मात्र तो योग जुळून आला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नांदेडच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचे स्थान असलेल्या ‘संगीत शंकर दरबार’ या कार्यक्रमासाठीही आशाताईंना निमंत्रित करण्यात आले होते. नांदेडकरांना त्यांचे जादुई सूर प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळावी, अशी इच्छा होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत.
आशाताईंच्या निधनामुळे भारतीय संगीत विश्वाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असून, त्यांच्या नांदेड भेटीची अपूर्ण राहिलेली इच्छा कायमचीच वेदना देऊन गेली, अशा भावना Ashok Chavan यांनी व्यक्त केल्या.




