नांदेड रेल्वे विभागाची उल्लेखनीय कामगिरी; प्रवाशांच्या सुरक्षिततेत होणार वाढ


नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आदिलाबाद स्थानकावर दोन महत्त्वाची पायाभूत सुविधा संबंधित कामे यशस्वीपणे पूर्ण करत गती शक्ती युनिटच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. या कामांदरम्यान रेल्वे वाहतुकीत कमीत कमी अडथळा येईल याची विशेष दक्षता घेण्यात आली.



मार्च महिन्याच्या अखेरीस आदिलाबाद स्थानक यार्डमध्ये लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 30 ऐवजी प्रस्तावित रोड अंडर ब्रिज (RUB) बांधकामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. या अंतर्गत 26.8 मीटर लांबीचा RH गर्डर ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान ट्रॅकखाली बसवून त्यानंतर प्रीकास्ट RCC बॉक्स सेगमेंटच्या साहाय्याने मजबूत संरचना उभारण्यात आली. या प्रक्रियेत ट्रॅकखाली दोन व्हेंट असलेला RUB तयार करण्यात आला.


प्रत्येक व्हेंटमध्ये 1.50 मीटर रुंदीचे आठ RCC बॉक्स सेगमेंट बसवून एकूण 12 मीटर लांबीचा बॅरल तयार करण्यात आला असून हा RUB 42 अंशांच्या कोनात बांधण्यात आला आहे. पुढील टप्प्यात हा बॅरल भाग 46 मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.


याशिवाय, प्रवाशांच्या सोयीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आदिलाबाद स्थानकावर 12 मीटर रुंदीच्या नव्या फूट ओव्हर ब्रिज (FOB) साठी 11 गर्डर्स यशस्वीपणे लाँच करण्यात आले.

या कामांमुळे स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षितता, सुविधा आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, मर्यादित वेळेत तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक कामे पूर्ण करून नांदेड विभागाने आपली समन्वय क्षमता आणि तांत्रिक कौशल्य अधोरेखित केले आहे.




