Sunday, April 5, 2026
Google search engine
Homeसामाजिकअसरजन नाका–वाघाळा रस्ता खड्डेमय; वर्षभरापासून नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

असरजन नाका–वाघाळा रस्ता खड्डेमय; वर्षभरापासून नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

नांदेड (प्रतिनिधी)मनपा हद्दीतील असरजन नाका ते वाघाळा दरम्यानचा रस्ता ड्रेनेज लाईनच्या कामामुळे पूर्णतः नादुरुस्त झाला असून गेल्या वर्षभरापासून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खड्डेमय रस्ता, चिखल आणि अडकणारी वाहने यामुळे परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

प्रभाग क्रमांक २० मधील त्रिमूर्ती नगर, विठ्ठल नगर, साईबाबा नगर आणि श्रीराम नगर या भागात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. या परिसरात पोलीस कर्मचारी, डॉक्टर तसेच सैन्यदलातील जवानांचे कुटुंबीय वास्तव्यास असूनही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ड्रेनेज काम अपूर्ण; रस्ता अधांतरी
ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ता मधोमध खोदण्यात आला; मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे, तर अनेक ठिकाणी कनेक्शनही देण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी, रस्ता पूर्णपणे उखडलेला असून मोठी वाहने वारंवार अडकून पडत आहेत.

पावसामुळे परिस्थिती बिकट
अवकाळी पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. चिखल आणि पाण्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांचा संताप; तातडीची मागणी
परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. काही नागरिकांनी स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मोठ्या वाहनांच्या ये-जा मुळे पुन्हा रस्ता खराब झाला. आता तरी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!