स्वामी समर्थ केंद्रात धार्मिक वातावरण; १५ एप्रिल रोजी महाआरतीने होणार समारोप


हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात सुरू असलेल्या अखंड नामजप यज्ञ व पारायण सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक ९ एप्रिलपासून सुरू झालेल्या या धार्मिक सोहळ्यात विविध पूजाअर्चा, अखंड नामजप यज्ञ, पारायण आणि हवन विधी सुरू आहेत.



या सप्ताहात गुरुचरित्र पारायण, वीणा पारायण, अखंड नामजप यज्ञ, देवी-देवतांची सेवा तसेच खंडोबाची सेवा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा आरती केली जात असून, यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.


भारत देशात शांतता नांदावी, देशाची सुरक्षा अबाधित राहावी तसेच युद्धजन्य परिस्थिती टळावी, या उद्देशाने हा धार्मिक उपक्रम राबवण्यात येत असल्याचे स्वामी समर्थ केंद्राच्या आयोजक महिलां मंडळीनी सांगितले.


या सप्ताहाचा समारोप दिनांक १५ एप्रिल रोजी बुधवारी सकाळी १०.३० वाजता महाआरतीने होणार आहे. या सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी, विशेषतः महिला मंडळींनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. एकूणच या उपक्रमामुळे परिसरात धार्मिक व सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.





