नांदेड | नांदेड ग्रामीण पोलिसांनी सोशल मीडियावर हत्यारांचे फोटो टाकून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल 15 गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत करण्यात आली आहे.


पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार सोशल मीडिया अकाउंट्सचे निरीक्षण करण्यात येत होते. तपासादरम्यान काही व्यक्तींनी इंस्टाग्रामवर खंजर, तलवार, गावठी कट्टा यांसह फोटो पोस्ट करून ते व्हायरल केल्याचे आढळले. तसेच काही आरोपींनी आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट केल्याचेही समोर आले.


याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 333, 335, 340/2026 (कलम 3/25 शस्त्र अधिनियम) गु.र.नं. 334 ते 348/2026 (कलम 4/25 शस्त्र अधिनियम) अशा एकूण 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूण 15 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून काही आरोपी अद्याप अनोळखी आहेत.


पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, सोशल मीडियावर बेकायदेशीर व आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियावर हत्यारांचे प्रदर्शन किंवा आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाई केली जाईल नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वीही नांदेड ग्रामीण पोलिसांनी अशाच प्रकारे 10 आरोपींवर गुन्हे दाखल केले होते. या प्रभावी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.




