नांदेड (प्रतिनिधी) जगभरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या तीन प्रमुख अवैध व्यापारांपैकी मानवी तस्करी हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. विशेषतः महिला आणि अल्पवयीन मुलींच्या खरेदी-विक्रीच्या घटनांनी समाजासमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागानेही सक्रिय पावले उचलली असून, स्वतंत्र प्रतिबंधक कक्ष स्थापन करून महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड येथे वर्षा डहाळे या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मानवी तस्करी प्रतिबंधक कार्याला अधिक गती मिळत असल्याचे दिसून येत आहे.


या पार्श्वभूमीवर 2002 साली Save the Children India (एसटीसीआय) च्या माध्यमातून “SOS – Save Our Sisters” (आपल्या बहिणींना वाचवा) ही महत्त्वपूर्ण चळवळ सुरू करण्यात आली होती. या चळवळीची सुरुवात विपुला कादरी यांच्या पुढाकारातून झाली. ग्रामीण भागातील महिला व मुलींची फसवणूक करून त्यांना मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या महानगरांमध्ये विक्रीसाठी नेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते. या अमानुष प्रकारांना आळा घालण्यासाठी “आपल्या बहिणींना वाचवा” ही चळवळ देशपातळीवर राबविण्यात आली.


मराठवाडा विभागात या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळाला. 2002 पासून विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि कार्यशाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जागरूकता निर्माण करण्यात आली. या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांमध्ये सतर्कता वाढली आणि अशा प्रकारांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले.

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव मुंडकर यांनी या चळवळीच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे परिणाम आजही दिसून येत असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, विपुला कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या चळवळीने देशपातळीवर सकारात्मक प्रभाव निर्माण केला. महाराष्ट्रात प्रारंभी सोलापूर येथे सुरू झालेले कार्य आता नांदेड जिल्ह्यातही प्रभावीपणे सुरू असून, पोलिस प्रशासनाच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे.

या चळवळीत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांचा सक्रिय सहभाग राहिला. त्यामध्ये गोविंदराव मुंडकर, व्यंकटराव पांडवे, सय्यद मोहियोधीन, मारुती वड्डे, बाबुराव उप्पलवार आदींचा समावेश होता. त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून गावागावात जाऊन जनजागृती केली, कार्यशाळा आयोजित केल्या आणि महिलांना तसेच मुलींना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
दरम्यान, स्थानिक पातळीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा मानवी तस्करीविरोधात अधिक सजग झाली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या माध्यमातून हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. अशा कारवायांमुळे या चळवळीला प्रत्यक्ष बळ मिळत असून समाजात विश्वास निर्माण होत आहे.
एकूणच, “सेव आवर सिस्टर” ही चळवळ केवळ जनजागृती पुरती मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारी ठरली आहे. सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मानवी तस्करीविरोधात प्रभावी लढा उभारला जात असून, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा गुन्ह्यांविरोधात उभे राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.




