नाशिक| पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला भव्य आणि अविस्मरणीय स्वरूप देण्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.


अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी तपोवन येथील श्री स्वामी नारायण मंदिरात ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांच्यासह विविध संत-महंत उपस्थित होते.


मुख्यमंत्री म्हणाले की, कुंभ मेळा (Kumbh Mela) हा भारतीय अध्यात्मिक संस्कृतीचा सर्वात मोठा सोहळा असून, भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. नाशिक (Nashik) आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे होणाऱ्या या सोहळ्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

गोदावरी नदीचे पाणी निर्मळ व प्रवाही राहावे यासाठी उपाययोजना सुरू असून, त्र्यंबकेश्वर येथे बारमाही प्रवाहासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुशावर्तासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याशिवाय रस्ते रुंदीकरण, घाटांची संख्या व लांबी वाढविणे, रेल्वे स्थानकांवरील सुविधा, जुन्या मंदिरांचे संवर्धन आणि ओझर विमानतळ (Ozar Airport) चे विस्तारीकरण अशी कामे सुरू आहेत.


साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला असून, सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज (Prayagraj) च्या धर्तीवर ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रयागराजचा दौरा करून तेथील नियोजनाचा अभ्यास केला आहे.
मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा दहा पट अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने नियोजन अधिक काटेकोरपणे करण्यात येत आहे. साधू-संतांच्या सूचनांचाही या प्रक्रियेत समावेश केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
भारतीय संस्कृतीच्या जतनात संतांचा मोठा वाटा असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, कुंभमेळा हा केवळ स्नानाचा नव्हे, तर विचारांच्या देवाणघेवाणीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सोहळा आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळा अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




