हिमायतनगर| सरसम ते हिमायतनगर मार्गावरील म्हसोबा नाल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सरसम येथील रमेश गुंडेकर, अविनाश गोखले व लखन पंड्या हे तिघे शुक्रवार दिनांक 10 रोजी रात्री 8 वाजता मोटरसायकलवरून हिमायतनगरहून सरसम गावाकडे जात होते. दरम्यान, भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.



या भीषण धडकेत लखन पंड्या यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश गुंडेकर आणि अविनाश गोखले हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सरसम–हिमायतनगर मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


“हिमायतनगर तालुक्यात सलग अपघातांच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर बसवून वाहतूक नियंत्रणाची प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत राहतील.”

“अपघातांची मालिका थांबवायची असेल तर केवळ तपासणी नव्हे, तर रस्ते सुरक्षा उपायांची अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.” “राष्ट्रीय महामार्गावर वेगमर्यादा नियंत्रणात ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर, सूचना फलक आणि पोलिसांची सतत गस्त ही काळाची गरज बनली आहे.”




