मुंबई | भारतीय संगीतविश्वातील महान पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी (12 एप्रिल 2026) मुंबईत निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या.


मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अत्याधिक थकवा, छातीत इन्फेक्शन तसेच हृदय व श्वसनासंबंधी गुंतागुंतींमुळे त्यांचे निधन झाले.


त्यांच्या निधनाची माहिती मुलगा आनंद भोसले यांनी दिली असून, उद्या सकाळी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी शिवाजी पार्क येथे होणार आहेत.

आठ दशकांची सुवर्ण कारकीर्द

आशा भोसले यांनी 1940च्या दशकात आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली आणि हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली. त्यांचा आवाज, बहुविध शैली आणि अद्वितीय गायकीमुळे त्या भारतीय संगीताचा अविभाज्य भाग बनल्या.
संगीतविश्वात शोककळा
त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ संपला असून, देशभरातून कलाकार, चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. “आशाताईंचा आवाज कायम आपल्या मनात जिवंत राहील” – अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.




