महाराजस्व शिबिरातून जनतेच्या अडीअडचणींचा निपटारा – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

लोहा| महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी धोरणांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिरांमुळे नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा जागीच निपटारा होत असून अशा शिबिरांचा नागरिकांना मोठा फायदा होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

तालुक्यातील कापशी (बु.) येथे शुक्रवारी (दि. १० एप्रिल) हे शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेने तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कंधार-दोनूर अनन्या रेड्डी आणि तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर होते. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासन अधिक गतिमान होण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली. नागरिकांच्या अडीअडचणींचे तात्काळ निराकरण होत असल्याने वेळ व श्रम वाचतात, तसेच पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ लवकर मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या तिसऱ्या राजस्व शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, पंचायत समिती, भूमिअभिलेख, जिल्हा परिषद बांधकाम, दुय्यम निबंधक, पशुधन विकास व शिक्षण विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. संबंधित विभागांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती देत अर्ज स्वीकारले.

तहसील कार्यालयाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर महसुली सेवा देण्यात आल्या. ऑनलाईन सातबारा, आठ-अ व फेरफार उतारे वितरित करण्यात आले. अकरा पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच सोळा नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले व दुरुस्तीसाठी अर्ज स्वीकारले गेले. याशिवाय उत्पन्न व रहिवासी अशा एकूण ३० प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

आरोग्य, भूमिअभिलेख व पंचायत विभागांनीही विविध सेवा पुरवून नागरिकांना दिलासा दिला. तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी प्रास्ताविकात अभियानाचे स्वरूप स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी शिवकांता पवार यांनी केले. या प्रसंगी माजी सभापती आनंदराव पाटील, सुभाष गायकवाड, राजू पाटील कापशिकर, केरबा पाटील कापशिकर, उपअभियंता बनसोडे, शिवाजी राठोड, नरबीटवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, नायब तहसीलदार राजेश पाठक, संदीप हाडगे, नागार्जुन खैरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिबिरातील विविध स्टॉलना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली व लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. या शिबिरामुळे परिसरातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top