नांदेड, गोविंद मुंडकर| शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय हे भावी शिक्षक घडविणारे महत्त्वाचे केंद्र असले तरी सध्या या महाविद्यालयाच्या परिसराची दयनीय अवस्था समोर येत आहे. विशेषतः महाविद्यालयाच्या इमारतीसमोरील पाण्याच्या टाकीजवळील मोकळी व आडोशाची जागा मद्यप्राशन करणाऱ्या टोळ्यांसाठी अड्डा बनल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे.


सन 2007 पासून नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्या इमारतीत कार्यरत असलेल्या या महाविद्यालयात उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.


मात्र, महाविद्यालयाच्या परिसरातील परिस्थिती चिंताजनक आहे. इमारतीसमोरील पाण्याच्या टाकीखालील जागा ही मोकळी व आडोशाची असल्याने काही व्यक्ती ती चुकीच्या कामांसाठी वापरत असल्याचे आढळून येत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महाविद्यालय प्रशासन आणि महानगरपालिकेकडून अपेक्षित नियंत्रण दिसून येत नाही.


शैक्षणिक स्तरावरही मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. सध्या केवळ एक प्राचार्य व चार अध्यापकांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असून, अनेक पदे रिक्त आहेत. मर्यादित साधनसामग्रीतही महाविद्यालय प्रशासन शैक्षणिक कार्य सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते.

दरम्यान, या प्रकारांना आळा घालण्यासाठी विमानतळ पोलीस ठाणे, नांदेड यांच्याशी समन्वय साधण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी चौकीदार नेमणे, तसेच परिसरात स्वच्छता आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी नागरिक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.
एकूणच, शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या महाविद्यालयाच्या परिसरात निर्माण झालेल्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.




