नांदेड विभागात ‘डिजिटल अवेअरनेस डे’; रेल्वे स्थानकांवर कॅशलेस व्यवहारांना चालना

नांदेड (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आज “डिजिटल अवेअरनेस डे” उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती कार्यक्रम घेऊन प्रवाशांमध्ये डिजिटल पेमेंटबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.

नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशीम आणि आदिलाबादसह इतर स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधत डिजिटल व्यवहारांचे फायदे, सुरक्षितता आणि सोय यांची माहिती दिली. आदिलाबाद स्थानकावर केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवत डिजिटल पेमेंटचा संदेश दिला.

दरम्यान, हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर डिजिटल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीतून तिकीट खरेदीसह रेल्वे सेवांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. वाशीम, हिंगोली डेक्कन, जालना आणि छत्रपती संभाजीनगर स्थानकांवर हेल्प डेस्क उभारून प्रवाशांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे तिकीट बुकिंग आणि पेमेंट कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमादरम्यान ५०० हून अधिक प्रवाशांना डिजिटल पेमेंटचे फायदे आणि रेल्वेतील उपलब्ध डिजिटल सेवा यांची माहिती देण्यात आली. ऑनलाइन तिकीट बुकिंग, QR कोड प्रणाली आणि POS मशीनद्वारे पेमेंटसारख्या सुविधांची माहिती देण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना IRCTC Rail Connect, RailOne अॅप तसेच BHIM/UPI अॅप्सच्या माध्यमातून सहज व सुरक्षित व्यवहार करण्याचे आवाहन केले. डिजिटल पेमेंटमुळे रांगा टाळता येतात, वेळेची बचत होते, रोख रकमेची गरज कमी होते आणि व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होतात, असेही सांगण्यात आले.

या उपक्रमामागील उद्देश प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे हा असून, केंद्र सरकारच्या “डिजिटल इंडिया” अभियानाला चालना देणे आहे. दक्षिण मध्य रेल्वे अशा जनजागृती उपक्रमांद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे जनसंपर्क विभागाने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top