नांदेडमध्ये ‘सर्च अँड शूट’ ऑपरेशनची मागणी; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नांदेड| शहरासह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईची गरज व्यक्त करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते प्रकाश मारावार यांनी पोलिसांनी तात्काळ ‘सर्च अँड शूट’ ऑपरेशन राबवावे, अशी जोरदार मागणी केली आहे.

नांदेड शहर व जिल्ह्यात सध्या गोळीबार, हत्या, लुटमार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय रेती माफिया, सट्टा-जुगार, आयपीएल सट्टेबाजी, मटका, गुटखा यांसारख्या अवैध व्यवसायांचे जाळे वाढत असून त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मारावार यांनी प्रशासनावर टीका करत म्हटले की, “राजकीय वरदहस्तामुळे काही ठिकाणी अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. एवढेच नव्हे तर दोन तालुक्यांतील नगराध्यक्षांवरही अवैध व्यवसायांमध्ये सहभागाचे आरोप आहेत. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

रेती माफियाच्या वाढत्या कारवायांवरही त्यांनी बोट ठेवत, केवळ बोटी जप्त करणे किंवा वरवरच्या कारवाया न करता संबंधितांवर एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. लाल रेतीच्या व्यवहारात कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असून, प्रशासनाच्या डोळ्यासमोर दररोज शेकडो गाड्या कर्नाटकात पाठवल्या जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

एकूणच, नांदेड जिल्ह्यात वाढत्या अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी ठोस आणि प्रभावी कारवाई करत विशेष मोहिम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top