नांदेडमध्ये वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; 394 केसेस, 4.48 लाखांचा दंड वसूल

अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहने व अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई

नांदेड| शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखा वजिराबाद आणि इतवारा पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत एकूण 394 प्रकरणे नोंदवून 4 लाख 48 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. शहरात सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना/परमिट वाहने, ट्रिपल सीट, भरधाव वेग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणारे अनधिकृत फळ गाडे व हातगाडे यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

शहर वाहतूक शाखा इतवारा येथील पोलीस निरीक्षक जगन पवार यांनी जुना मोंढा, हबीब टॉकीज, बकी चौक परिसरात तपासणी मोहीम राबवून 42 प्रकरणे नोंदवली व 46,500 रुपयांचा दंड आकारला. तर शहर वाहतूक शाखा वजिराबादचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदिर, वर्कशॉप, राजकॉर्नर व छत्रपती चौक परिसरात कारवाई करत 362 केसेस नोंदवून 4,01,900 रुपयांचा दंड वसूल केला. या संयुक्त कारवाईत एकूण 394 प्रकरणे नोंदवून 4,48,400 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन : वाहने निर्धारित पार्किंगमध्येच उभी करावीत, सिग्नलचे पालन करावे, रस्त्यावर अतिक्रमण करू नये व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे कृत्य टाळावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, शहरातील वाहतूक शिस्त राखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top